मुंबई– राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचा आवाज काढून थेट मुख्यमंत्री कार्यालयात एका पठ्ठ्याने फोन केला. तसेच अमुक एक व्यक्तीची बदली अमुक ठिकाणी करा, असे थेट फर्मान दिले.
या प्रकारामुळे अधिकारीही चक्रावले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क केला असता तो बोगस कॉल असल्याचे उघड झाले. त्यानंतर गावदेवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत एक संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यास फोन आला. समोरचा व्यक्ती मी शरद पवार बोलतोय, असे सांगत होता. समोरून येणारा आवाज ही तसा परिचित होता. आता खुद्द शरद पवार हेच बोलत आहे म्हटल्यावर अधिकाऱ्यांने सविस्तर सर्व ऐकून घेतले.
या प्रकाराने मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी बुचकळ्यात पडले. पण त्यांना काही गोष्टींमध्ये विसंगती आढळली. यामुळे खात्री करून घेण्यासाठी एका अधिकाऱ्याने सिल्व्हर ओक गाठून शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या कानावर घडलेला प्रकार टाकण्यात आला. यानंतर हा प्रकार खोटा असल्याचे स्पष्ट झाल्याने गावदेवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुन्हा आयटी कायद्यानुसार दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पथकानेही सुरू केला आहे. या प्रकरणी त्यांनी एका संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.