कॅनबेरा -न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ख्रिस केर्न्स याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने दिली आहे. त्याला ऑस्ट्रेलियातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो सध्या व्हेंटीलेटरवर आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेल्या केर्न्सला गेल्या आठवड्यात येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला लवकरच सिडनी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.
केर्न्सवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्या तरीही त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. न्यूझीलंड क्रिकेट संघाचा एकेकाळचा सर्वात यशस्वी अष्टपैलु असलेला केर्न्स आता 51 वर्षांचा आहे. त्याचे वडील लान्स केर्न्स देखील न्यूझीलंडच्या महान क्रिकेटपटूंमध्ये गणले जातात.
केर्न्सने न्यूझीलंडकडून 62 कसोटी आणि 215 एकदिवसीय सामने खेळले असून त्याने दोन आंतरराष्ट्रीय टी-20 सामनेही खेळले आहेत. केर्न्सवर मॅच फिक्सिंगचेही आरोप करण्यात आले होते. 2015 साली लंडनच्या न्यायालयाने त्याला क्लीनचीट देत दिलासा दिला होता.