नगर – दिपावलीचा सण करोनाच्या सावटाखाली सर्वत्र साजरा होत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सुरु झालेल्या महामारीने आरोग्यबाबतची जागरुकता आधोरिखित केली आहे. त्यामुळे सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती बनली आहे. फिनिक्स फाउंडेशनने या करोना काळातही नेत्र शिबीराच्या माध्यमातून गरजू-गरीबांच्या अंधकारमय जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. या कार्यातून समाजातील अंधांना दृष्टी मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित होत आहे, असे प्रतिपादन अक्षय कर्डिले यांनी केले.
फिनिक्स फाउंडेशनच्यावतीने नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी चाइल्ड लाइनचे हनिफ शेख, आनंदऋषीजी नेत्रालयाचे आनंद छाजेड, रामलाल पटवा, फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, बाबासाहेब धीवर, अविनाश देडगांवकर आदी उपस्थित होते.
हनिफ शेख म्हणाले, शासनाच्यावतीने 6 ते 18 वर्षे वयोगटातील अनाथ मुला-मुलींसाठी संपूर्ण शिक्षण, निवास व इतरही सर्व जबाबदारी शासनाच्यावतीने घेण्यात येणार आहे. समाजातील अनाथ मुला-मुलींना याचा लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक संघटना, संस्थांनी पुढे यावे.
याप्रसंगी बोरुडे म्हणाले, फिनिक्स फाउंडेशनच्यावतीने करोना काळातही शिबीरात खंड पडू न देता रुग्णसेवेचे व्रत सुरु ठेवले आहे. समाजातील गोर-गरिबांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी फाउंडेशनचे कार्य करत आहे.