- सुधारणा करण्यासाठी पुणे विद्यापीठाचे पाऊल
- स्पेशलायझेशन विषयात वाढ करण्याचा निर्णय
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता “एम.कॉम’ या पारंपरिक अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी पाऊल उचलले आहे. या पारंपरिक अभ्यासक्रमातून रोजगाराची संधी उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर विद्यापीठाने सध्याच्या काळातील आणि उद्योग क्षेत्रातील मनुष्यबळाची निकड लक्षात घेत “एमकॉम’च्या स्पेशलायझेशन विषयात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे विद्यापीठामध्ये एम.कॉम. व ई-कॉमर्स एम.कॉम. असे अभ्यासक्रम शिकवले जायचे. त्यासाठी 60 जणांची प्रवेश क्षमता होती. त्यानंतर इंटरनेट व ऑनलाइन व्यवहारामध्ये होणारी वाढ याचा विचार करता पुणे विद्यापीठाने ई-कॉमर्स एम. कॉम. अभ्यासक्रम नव्याने सुरू केला होता. सुरुवातीची दोन वर्षे हा अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने सुरू होता. मात्र, त्यानंतर तेथे मिळणारे शिक्षण व प्रत्यक्षात मार्केटची स्थिती यामध्ये भिन्नता असल्याने त्यामधून नोकरीची संधी कमी झाली. गेल्या दोन-तीन वर्षांपासून या अभ्यासक्रमाची विद्यार्थी संख्या 25 पेक्षा कमी झाली. त्यामुळे हा अभ्यासक्रम बंद करावा या दृष्टीने चर्चा सुरू आहे.
पुणे विद्यापीठाने एम.कॉम.मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार द्वितीय वर्षापासून विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशनची संधी देण्यात आली. त्यामध्ये तिसऱ्या सेमिस्टरमध्ये तीन व चौथ्या सेमिस्टरमध्ये तीन असे सहा विषय स्पेशलायझेशनचे असतील. त्याची अंमलबजावणी 2021-22 या शैक्षणिक वर्षात द्वितीय वर्षाला गेलेल्या विद्यार्थ्यांपासून केली जाणार आहे.
दरम्यान, कॉर्पोरेट अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट, बॅंकिंग अँड फायनान्स, डिजिटल मार्केटिंग अँड ई-कॉमर्स आणि बिझनेस प्रोसेस हे चार विषय स्पेशलायझेशन आहेत. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार एका विषयात स्पेशलायझेशन करू शकतील, अशी माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली.