मुंबई: जागतिक बाजारात नुकताच खनिज तेलात झालेल्या विक्रमी घसरणीचा भरघोस फायदा पेट्रोलियम कंपन्यांना होणार आहे. खनिज तेलातील स्वस्ताई आणि रुपया डॉलरसमोर मजबूत झाल्यास पुढील आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.
या घसरणीचे भारतात तात्काळ परिणाम दिसून आले नसले तरी येत्या काही दिवसांत कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करतील, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे. पेट्रोल किमान 8 रुपयांनी स्वस्त होऊ शकते. मागील दोन महिन्यात चीनमधील करोना विषाणूने आशियातिल तेलाच्या मागणीत मोठी घट झाली आहे. परिणामी तेलाचे भाव गडगडले आहेत.
दरम्यान आज पेट्रोल दरात 13 ते 15 पैशांची घसरण झाली. मुंबईत पेट्रोलचा दर 75. 70 रुपये होता. दिल्लीत 70 रुपये होता. कोलकात्यात 72.70 रुपये आणि चेन्नईत 72.71 रुपये होता. हा गेल्या नउ महिन्यातील पेट्रोलचा नीचांकी भाव आहे. डिझेल दरात 16 पैशांची घसरण झाली.
राज्य सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क वाढवले नाही, तर ग्राहकांना इंधन दर कपातीचा फायदा मिळेल. नुकताच राज्य सरकारने अर्थसंकल्पात इंधनावर 1 रुपया अधिभार जाहीर केला होता.