नवी दिल्ली -इंधनसंपन्न मध्य पूर्वेत तणावाची स्थिती कायम असल्याचा परिणाम भारतात जाणवत आहे. त्यातून भारतात सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागले.
मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक बाजारपेठेतील कच्च्या इंधनांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सोमवारी भारतात लिटरमागे पेट्रोल 15 पैशांनी तर डिझेल 17 पैशांनी महागले. त्या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल 75 रूपये 69 पैशांवर तर डिझेल 68 रूपये 68 पैशांवर पोहचले. पाच दिवसांत मिळून पेट्रोल 53 पैशांनी तर डिझेल 72 पैशांनी महागले आहे.
भारताला इंधन गरज भागवण्यासाठी 84 टक्के आयात करावी लागते. त्या आयातीत मध्य पूर्वेतील देशांचा वाटा दोन-तृतीयांश इतका आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील कच्च्या इंधनांच्या किमती वाढल्याचा थेट परिणाम भारतावर होतो. अमेरिका आणि इराणमधील संबंध ताणले गेल्याने मध्य पूर्वेत संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यातून त्या विभागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ती निवळल्यानंतरच इंधन दरवाढीबाबत भारताला दिलासा मिळू शकतो.