अमेरिका-इराण तणावाचा मोठा फटका
गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटी रुपयांचे नुकसान
मुंबई – अमेरिका आणि इराणमधल्या तणावाचा शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेच्या एअर स्ट्राइकमध्ये जनरल कासेम सिलेमनीचा झालेला मृत्यू आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकवर कठोर निर्बंध लादण्याची दिलेली धमकी याचा शेअर बाजारावर विपरित परिणाम झाला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 788 अंकांनी कोसळून 40,676 अंकांवर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 234 अंकांनी कोसळून 11,993 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारावर अमेरिका-इराणमधल्या संभाव्य युद्धाचे सावट आहे. गुंतवणूकदारांच्या तीन लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. धातू, बॅंका आणि वाहन कंपन्यांच्या शेअर्सना आज सर्वाधिक फटका बसला. बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये आज सर्वाधिक घसरण दिसून आली असून त्यांचे शेअर 4.63 टक्क्यांनी कोसळले. तसेच एसबीआय, एचडीएफसी, ऍक्सीस आणि आयसीआयसीआय बॅंकेचे शेअरही कोसळले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा बदला घेण्याचा इशारा दिल्यानंतर जागतिक बाजारातील समभागांच्या अनुषंगाने देशांतर्गत बाजारात तीव्र विक्री झाली.
कच्च्या तेलाच्या परिणामामुळे इतर विकसनशील बाजारपेठांपेक्षा भारतीय बाजारपेठा नकारात्मक प्रतिक्रिया दर्शवित आहेत. खर्चाच्या टक्केवारीच्या रूपात आपली क्रूड आयातीवरील अवलंबन सर्वाधिक असल्याने अर्थव्यवस्था आणि बाजारावरही त्याचा परिणाम जास्त आहे, अशी माहिती वरिष्ट अधिका-यांनी दिली.
दरम्यान, जगातील एकूण तेल उत्पादनापैकी निम्मे तेल उत्पादन पश्चिम आशियामध्ये होते. इराणकडून तेल आयात थांबवल्यामुळे आपण इराक आणि सौदी अरेबियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो. कासेम सिलेमनीला इराकच्या भूमिवर संपवण्यात आले आहे. उद्या युद्ध इराकच्या भूमिवर लढले गेल्यास भारताला केल्या जाणाऱ्या तेल आयातीवर निश्चित परिणाम होईल. त्याचा मोठा आर्थिक फटका भारताला बसू शकतो.