नवी दिल्ली: देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून एकीकडे राजकारण सुरु आहे. तर दुसरीकडे केंद्रात सत्तेत असणाऱ्या मंत्र्यांकडून या दरवाढीवर आपापली मते आणि दावे दिले जात आहेत. केंद्र सरकारने देशभरातील कोट्यवधी नागरिकांना मोफत करोना लस दिली. त्यामुळेच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, अशी मुक्ताफळे केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी उधळली आहेत.त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.
देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी शंभरी गाठल्याने सर्वसामान्य नागरिक महागाईच्या वणव्यात होरपळत आहेत. त्यात आता केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री रामेश्वर तेली यांनी आपल्या विधानाने एकाच खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारने देशभरातील कोट्यवधी नागरिकांना मोफत करोना लस दिल्याने पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, अशी मुक्ताफळे तेली यांनी उधळली.ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हिमालयातील एक लिटर पाणी एक लिटर पेट्रोलपेक्षाही महाग असल्याचे म्हटले आहे.
पेट्रोल, डिझेल महाग नाहीय, केंद्र आणि राज्यांनी त्यावर कर लावला आहे. त्यातच नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस केंद्राने मोफत दिली आहे. मग त्या लसींसाठी पैसे कुठून येणार? तुम्ही लसीसाठी पैसे दिले नाहीत. त्यामुळे करांमधून लसींची किंमत वसूल करण्यात आली आहे, असे अजब वक्तव्य केल्याने केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री तेली यांनी इंधन दरवाढीच्या सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठच चोळले असल्याचे दिसत आहे.
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर स्थिर आहेत. ब्रेंट क्रूडने पुन्हा एकदा प्रति बॅरल 84 डॉलरची पातळी ओलांडली आहे. तर अमेरिकन बेंचमार्क क्रूड (Crude) 80 डॉलर्सच्या पार आहे. दरम्यान, आज देशातील तेलाच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दरम्यान, गेले सात दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच होतं. आज किमती स्थिर असल्यानं काही अंशी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे.
भारतीय तेल कंपन्यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या नव्या दरांनुसार, मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये आज दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दोन्हींचे दर वाढलेले नाहीत. यापूर्वी 4 ऑक्टोबर रोजी तेलाच्या किमती स्थिर होत्या.