वाघोली (प्रतिनिधी) – वाघोलीचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर मागील आठ महिन्यांपासून विनावेतन महापालिकेच्या सेवेत काम करणाऱ्या वाघोली ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचे वेतन पुणे महापालिकेच्यावतीने त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. ग्रामपंचायत वेतन श्रेणीनुसार आठ महिन्यांचे वेतन जमा होणे आवश्यक होते मात्र फेब्रुवारी महिन्याचे वेतन जमा झाले असले तरी टप्प्याटप्प्याने वेतन जमा होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
“ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संघटना यांनी वारंवार महापालिकेकडे मागणी केली होती. या मागणीला यश आले आहे.”
– राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच, वाघोली
पुणे महापालिकेत वाघोलीसह 23 ग्रामपंचायतींचा समावेश झाल्यानंतर येथील ग्रामपंचायत कर्मचारी देखील महापालिकेच्या सेवेत रुजू झाले. बोगस कर्मचारी भरतीचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीत ठपका ठेऊन अहवाल जिल्हा परिषदेच्यावतीने महापालिकेकडे सादर करण्यात आला. त्यानंतर महापालिकेने सदर कर्मचाऱ्यांचे वेतन जमा करण्याचे आदेश क्षेत्रीय सहाय्यक आयुक्तांना काढले होते. त्यानुसार वाघोलीतील सर्व कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्यातील वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून उर्वरित वेतन टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहे.