मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या ठाण्यातील ‘उत्तर सभे’ची उत्सुकता सर्वांना होती. त्यानुसार राज ठाकरे यांनी आज सभा घेतली. या सभेत त्यांनी चौफेर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
राज ठाकरे म्हणाले, शरद पवार हे स्वत: कोणत्याही धर्माला मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात, त्यांच्या पक्षामुळेच महाराष्ट्रात जातीय राजकारण फोफावतंय. शरद पवारांच्याकडे घेण्यासारखे अनेक चांगले गुण आहेत, पण त्यांच्या जातीय राजकारणाचे काय करायचं असा सवाल त्यानी केला आहे.
शरद पवार म्हणतात, मी जातीयवाद भडकवतो. शरद पवारांनी सांगावे की राज ठाकरे त्याची भूमिका बदलतो? राष्ट्रवादी कॉंग्रेसनं हे बोलावं? परदेशी पंतप्रधान चालणार नाही हे बोलणारे बाळासाहेब ठाकरे पहिले होते. तो धागा पकडून शरद पवार 99 ला कॉंग्रेसमधून बाहेर पडले. निवडणुकांचा निकाल लागला आणि परत कॉंग्रेसमध्ये गेले आणि कृषीमंत्री झाले.
दोन महिन्यांत भूमिका बदलली. शरद पवारांनी आत्तापर्यंत असंख्य भूमिका बदलल्या. हे काय मला सांगतायत. मी कोणती भूमिका बदलली? हिंदुत्वाची भूमिका मी आज नाही आणलीये. पाकिस्तानी कलाकारांना लाथ मारू हाकलण्याची भूमिका घेणारा पक्ष कोणता होता? पाकिस्तानी कलाकारांना घ्याल, तर याद राखा ही नोटीस सगळ्या निर्मात्यांना कुणाकडून गेली होती? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.