आळंदी – येथे माऊली मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असणारी पांडुरंग क्षीरसागर यांच्या प्रॉपर्टीमध्ये आज दुपारी चारच्या दरम्यान अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन धर्मशाळेला आग लागली. आगीची तीव्रता एवढी होती की, आजूबाजूचे लोकदेखील घाबरून दूर जात होते. कार्यकर्त्यांनी प्रथम आग पाण्याने विझवण्याचा प्रयत्न केला. तद्नंतर आळंदी नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.
ही धर्मशाळा अरुंद रस्त्यातील बोळात असल्याने अग्निशामन दलाची मोठी गाडी त्याठिकाणी जाऊ शकली नाही. त्यामुळे आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी ताबडतोब चाकण अग्निशमन दल व पीएमआरडीए यांना पाचारण करून दोन गाड्या बोलावण्यात आल्या. सुमारे 200 मीटर दूर असणाऱ्या मिळकतीपर्यंत पाइप जोडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केला. यावेळी अग्निशमन विभाग प्रमुख अक्षयकुमार शिरगिरे, वाहन चालक ऑपरेटर विलास पवार, अक्षय त्रिभुवन, पद्माकर श्रीरामे, तुळशीराम कोळपे, संजय पवार आदींनी विशेष परिश्रम घेत आग विझवण्याचे काम केले.
फ्रीजच्या कॉम्प्रेसरचाही स्फोट
याच वेळी घरात असणाऱ्या दुसऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला. यावेळी येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली विलास पवार यांनी जीवावर बेतून सिलेंडरवर पाण्याचा मारा करीत इतर सिलेंडर बाहेर काढले. एकीकडे उन्हाची तीव्रता व दुसरीकडे आगीचे डोंब यामुळे घरात असणारी सर्व महत्त्वाची कागदपत्रे व इतर सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यातच फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला.