कोल्हापूर (प्रतिनिधी) – राज्यात सर्कस आहे आणि त्यात प्राणीही आहेत असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्यात सर्कस चालू असल्याचे मान्य केले आहे, अस प्रत्युत्तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरातील विविध भागात सॅनिटायझर स्टॅंडसह इतर वस्तुंचे वाटप त्यांच्याच हस्ते झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्य सरकारवर आरोप करताना राज्यात सर्कस चालू असल्याची टीका केली होती. त्यावर पवार यांनी बोचरी टिका केली होती. या दोघांच्या वादात आता पाटील यांनी उडी घेतली आहे.
पाटील म्हणाले, आपल्याला पवार यांच्याविषयी आदर असून अनेकदा दिल्लीत जाऊन त्यांचे मी मार्गदर्शन घेतले आहे. पवार हे मोठे आहेत, त्यांच्यावर वारंवार टिपण करतो याचा अर्थ मी त्यांचा अनादर करतो असा होतो. पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात कधीही अनादर नाही तर आदरच आहे.
कोकणात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी सर्वप्रथम विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर गेले, त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि लगेच पवार हेही दौऱ्यावर आले. मात्र, आम्ही गेल्यावर टिका झाली.
तसेच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी बोलल्यानंतर पवार विदूषक म्हटले, प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. पण एवढे तरी बरे की पवार यांनी त्यांच्याकडे सर्कस आहे एवढे तरी मान्य केले आणि जे कोणी त्यात आहेत ते प्राणी आहेत, हेही मान्य केले.
यावर लगेच आव्हाड काही तरी बोलतील. पण सर्कस आहे हे मी म्हटलेलो नाही तर पवार यांनीच ते मान्य केले आहे. पवार यांच्याविषयी माझ्या मनात जेवढा आदर आहे तेवढा आव्हाड यांच्या मनात आहे का नाही हे मला माहित नाही, असा टोलाही त्यांनी लगाविला.