केंद्राची राज्यांना सूचना…
नवी दिल्ली – राज्य सरकारांनी केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर डेप्युटी सेक्रेटरी, संचालक, आणि जॉईन्ट सेक्रेटरी दर्जाचे जादा अधिकारी पाठवावेत अशी सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना केली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने ही सूचना केली होती पण त्याला राज्यांनी अत्यंत कमी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा ही सूचना जारी केली आहे.
राज्यांतील अधिकाऱ्यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठवल्याने त्यांना अनुभवही मोठा मिळू शकतो त्यामुळे राज्य सरकारांनी असे जादाचे अधिकारी त्वरित प्रतिनियुक्तीवर पाठवण्याची गरज आहे असे केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने म्हटले आहे. केंद्राकडे अशा अधिकाऱ्यांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे केडर मॅनेजमेंटमध्ये अडचणी निर्माण होत आहेत असेही केंद्र सरकारने राज्यांच्या निदर्शनाला आणून दिले आहे. हे पत्र सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आले आहे.
केंद्र सरकारी सेवेत पूर्ण कार्यकाळ व्यतित करू शकतील अशाच अधिकाऱ्यांची नावे केंद्रात प्रतिनियुक्तीसाठी पाठवावीत असेही या आदेशात म्हटले आहे. राज्य सरकारांकडून प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची केंद्रात डेप्युटी सेक्रेटरी, संचालक, जॉईन्ट सेक्रेटरी या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.