कराड – पाटणचे शिवसेनेचे आमदार यांची राजकीय ताकत दिवसेंदिवस पाटण मतदार संघात वाढू लागली आहे. गत पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर मतदार संघात त्यांच्या विरोधात काम करणारे राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करुन आ. शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहे. त्यामुळे शिवसेनेत इनकमिंग वाढल्याने आमदारांच्या निवासस्थानी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे.
आ. शंभूराज देसाईंच्या दौलतनगर येथील निवासस्थानी पक्ष प्रवेशासाठी मतदार संघातील शेडगेवाडी (विहे), मोरगिरी, वजरोशी, बाटेवाडी, पाठवडे, सुळेवाडी, पाळेकरवाडी, बहुले, सलतेवाडी, ताटेवाडी, भारसाखळे, तारळे, उत्तर तांबवे येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. आ. देसाईंच्या नेतृत्वाखाली या गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करीत आ. शंभूराज देसाईंचे नेतृत्व स्विकारले आहे.
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पाटण मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे राष्ट्रवादी पक्षाला व राष्ट्रवादीच्या पाटणच्या नेतृत्वाला कंटाळून आ. देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करीत असल्याचे वातावरण गेल्या 15 दिवसापासून पहावयास मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेत इनकमिंग मोठ्या संख्येने सुरु असल्याने विधानसभा निवडणूकीच्या दोन महिने अगोदरच पासूनच आ. शंभूराज देसाई यांच्या दौलतनगर निवासी राजकीय वातावरण ऐन पावसाळ्यात तापू लागले आहे.