प्रवाशांनी करोनाचे नियम बसवले धाब्यावर

बसची तहसीलदारांकडून अचानक तपासणी; मास्क न लावणार्‍या प्रवाशांना दंड

पारनेर – नगर-पुणे महामार्गावरून जाणार्‍या एसटी बसची तपासणी पारनेरच्या तहसीलदार  ज्योती देवरे यांनी अचानक केली. तपासणीत  15 ते 20 प्रवाशांनी मास्क न लावल्याचे आढळले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

पारनेर तालुक्यांमध्ये करोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे नागरिकांकडून पालन केले जाते का यासंदर्भात तहसीलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यातील गावांना भेटी  दिल्या जात आहेत. नियमावलीची अंमलबजावणी होत नसेल तेथे जात कारवाई केली आहे. सुपा येथे विविध ठिकाणी पाहणी करत नियम मोडणार्‍या व्यावसायिक व दुकानदार यांच्यावर कारवाई केली आहे. एसटीतून प्रवासी वाहतूक मोठ्या संख्येने सुरू झाली आहे. या प्रवासात करोना रोखण्यासाठी तयार करण्यात आलेले नियम धाब्यावर बसविण्यात येत आहेत. यामुळे शहरात वाढत असलेला संसर्ग आता गाव-खेड्यात पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

विनामास्क प्रवास करणार्‍या व्यक्तींची संख्या जास्त प्रमाणात आहे  बसमधील अनेक प्रवासी मास्कचे साधे नियमही पाळले जात नाहीत. एसटीच्या गाड्यांतून प्रवास करताना कोणत्याही प्रवाशांची चाचणी होत नाही. त्यामुळे प्रवासातच करोनाची बाधा होण्याचा धोका आहे. प्रवासात सुरक्षित अंतर ठेवण्याच्या नियमाचेही पालन होत नाही. यामुळे करोना नियमांना पायदळी तुडवून मोठ्या संख्येने वाहतूक सुरू आहे. या साठी तहसीलदार ज्योती देवरे यांनी  सुपा चौकामध्ये नगर तसेच पुणे या शहरातून येणार्‍या प्रवासी  बस थांबून  नियमाचे पालन न करणार्‍या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

देवरे यांनी बसमध्ये जाऊन प्रवाशांनी मास्क घातले आहेत की नाही याची तपासणी केली. तसेच प्रवासी बसमध्ये जेवढे प्रवासी बसून असतील तेवढ्यांना प्रवास करण्यासाठी परवानगी आहे. उभे राहून प्रवास करणारे नागरिक बस मध्ये असल्यास अशा बसवर देखील कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्यासंदर्भात त्यांनी पाहणी केली आहे.

प्रवाशांनी बसमध्ये बसताना करोनासंदर्भातील नियमाचे पालन करावे. तसेच बस मध्ये कोणीही विनामास्क आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रवासी बसमध्ये उभे राहून प्रवास करण्यास मनाई आहे.
ज्योती देवरे, तहसीलदार पारनेर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.