गजा मारणेच्या स्वागताला राजकीय नेते; शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना अटक

पिंपरी – कुख्यात गुंड गजा मारणे याची 15 फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटका झाली. त्यावेळी त्याने 300 अलिशान वाहनांच्या ताफ्यासह मिरवणूक काढली. याप्रकरणी तळेगाव आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या तपास पथकाने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना अटक केल्याने जेलमधून सुटलेल्या मारणेच्या स्वागताला राजकीय मंडळी देखील उपस्थित होते, हे आता स्पष्ट
झाले आहे.

गजा मारणे यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दरोड्यासह रॅली काढल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत. तर हिंजवडी पोलीस ठाण्यातही रॅली काढल्याप्रकरणी एक असे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 59 जणांना अटक केली आहे. तर रॅलीमध्ये सहभागी झालेली 23 वाहने जप्त केली आहेत. रॅलीसाठी पुणे, सातारा, नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड शहरातील सात वाहने सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी आत्तापर्यंत अटक केलेल्या आरोपींमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष संजय पिसाळ आणि शिवसेनचा तालुका अध्यक्ष संतोष शेलार यांचाही समावेश आहे. तसेच मोक्‍कातील आरोपी इजाज पठाण आणि खून प्रकरणातील आरोपी राहुल दळवी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. दळवी याने रॅलीमध्ये एक मर्सिडिज आणि स्वॉडा या दोन अलिशान वाहने पुरविल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गजा मारणेला अटक की शरण?
कुख्यात गुंड गज्या मारणे याला सातारा जिल्ह्यातून अटक केल्याचे सांगितले जात आहे. मात्र तो पोलिसांना शरण आला असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्याला शरण आणून देण्यात सातारा जिल्ह्यात जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रवादीचा एक नेता आणि पुणे शहरातील एका भाजपचा नेता याने महत्वपूर्ण भूमिका बजावल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

“ते’ वाहन मालकही अडचणीत
गजा मारणेच्या रॅलीमधील बहुतांश वाहने राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजकांची आहेत. त्या वाहन मालकांना पोलीस बोलावून अटक करीत आहेत. सुरुवातीला वाहन मालक “तो मी नव्हेच’ची भूमिका घेतात. मात्र फुटेजमधील वाहन दाखविल्यावर त्यांची दातखिळी बसते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.