फलटण बस वेळेत न आल्याने प्रवाशांचा संताप

इतर बस रोखल्याने सातारा बस स्थानकात तणावाचे वातावरण

सातारा – साताऱ्याहून फलटणला रात्रीच्या साडेआठ वाजता जाणारी एसटी बस साडेनऊ वाजले तरी फलाटावर न आल्याने संतप्त प्रवाशांनी सातारा बसस्थानकातच अधिकाऱ्यांना फैलावर घेत बस मिळेपर्यंत बस स्थानकातून एकही बस बाहेर जाऊ न दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, साताऱ्यावरून रात्री साडेआठच्या सुमारास फलटणला जाणारी नियमित बस आहे. महाविद्यालयीन तरूणांसह काही नोकरदार यांच्यासाठीही ही बस महत्वाची आहे. मात्र, गुरूवारी सायंकाळी साडेनऊ वाजले तरी फलटण जाणारी बस येत नसल्याने प्रवाशांनी वाहतूक  नियंत्रकांना विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रवासी संतप्त झाले होते.

दरम्यान, एसटीचा एकही वरिष्ठ अधिकारी त्यावेळी उपलब्ध नव्हता. एसटीच्या वरिष्ठांना भेटण्याचा आग्रह प्रवाशांनी धरल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त प्रवाशांनी बसस्थानकातच ठिय्या मारून एकही बस स्थानकाबाहेर जाऊ दिली नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ एसटीच्या वरिष्ठांशी चर्चा करून पावणेदहाच्या दरम्यान प्रवाशांना एसटी उपल्बध करून दिली. फलटणला जाणाऱ्या बसचा टायर पंक्‍चर झाल्याने काही गोंधळ उडाला होता. मात्र, काही वेळाने दुसरी बस उपलब्ध करून दिल्याचे विभागीय नियंत्रकांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.