कोयना धरणात 53.91 टीएमसी पाणीसाठा

पश्‍चिम भागातील तालुक्‍यांत पावसाचे पुनरागमन

पाटण – पाटण तालुक्‍याच्या पूर्वेकडील भागात शुक्रवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, कोयना पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस पडत असल्याने कोयना धरणातील पाणीसाठा संथगतीने वाढत आहे. सध्या धरणात 53.91 टीएमसी पाणीसाठा असून पाणीपातळी 2111.08 एवढी झाली आहे. दरम्यान, कराड तालुक्‍यातही तुरळक पावसाने हजेरी लावली. दरम्यान सातारा शहरासह पश्‍चिम भागातील गावांमध्ये पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. अधूनमधून जोरदार सरी तर काही ठिकाणी तुरळक पाऊस आहे.

मागील वर्षी या काळात कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत होता. मात्र, यावर्षी कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने काही प्रमाणात उसंत दिली आहे. पाटण, मल्हारपेठ, मोरगिरी, तारळे भागात आज सकाळपासून पावसाने एकसारखी सुरवात केली आहे. भात, भुईमूग, ज्वारी, सोयाबीन, नाचणी या पिकांची वाढ समाधानकारक झाली आहे. यामुळे पेरणी केलेले शेतकरी सध्या आनंदात आहेत. दरम्यान, गेल्या सतरा तासांत कोयना 65 मिलिमीटर, नवजा 94 मिलिमीटर, महाबळेश्‍वर 71, मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, कराड शहरासह तालुक्‍यातही शुकवार सकाळपासून तुरळक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आंतरमशागतीची कामे उरकल्याने पिकांच्या उगवणीसाठी हा पाऊस चांगला असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात होते. गेल्या काही दिवसांपासून पावसाने सर्वत्रच उसंत घेतली होती. वाढत्या उन्हामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दुबार पेरणी करावी लागणार की काय अशी भीती व्यक्‍त होत होती. मात्र, शुक्रवारी पुन्हा तुरळक पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. येत्या काही दिवसांत दमदार पावसाची गरज व्यक्‍त होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.