भोपाळ – मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला काही सरकारी अधिकारी उपस्थित असल्याचे चित्र समोर आल्यानंतर विरोधी कॉंग्रेस आणि सत्ताधारी भाजप यांच्यात शब्दयुद्ध सुरू झाले आहे. कॉंग्रेसच्या एका खासदाराने या विषयावर जोरदार आक्षेप नोंदवला आहे. अशा अधिकाऱ्यांना या वर्षअखेरीस होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीपासून दूर ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने म्हटले आहे की यातून केवळ कॉंग्रेसचा संघाच्या विरोधात असलेला द्वेषच दिसून येतो.
सतना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनुराग वर्मा आणि सतना महानगरपालिकेचे आयुक्त राजेश शाही हे 11 जून रोजी आयोजित आरएसएसच्या एका कार्यक्रमादरम्यान प्रार्थनेत सहभागी झाले होते. राज्य कॉंग्रेसच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष केके मिश्रा, यांनी त्यांचा हा फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे. असे अधिकारी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षपात न करता आपले कर्तव्य बजावतील, अशी अपेक्षा करता येत नाही. त्यांचे वर्तन नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्थीच्या विरोधात आहे असा दावा मिश्रा यांनी केला आहे.
या प्रकरणी आम्ही केंद्राच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे तक्रार करणार आहोत,असे त्यांनी सांगितले. भारतीय निवडणूक आयोगाने अशा अधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीपासून दूर ठेवावे, अशी मागणी कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य विवेक तंखा यांनी केली. तथापि, भाजपचे प्रदेश सचिव रजनीश अग्रवाल यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन केले नाही.संघाच्या कार्यक्रमात भाग घेणे बेकायदेशीर किंवा असंवैधानिक नाही आणि त्यातून आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही लोकशाहीवादी सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. अनेक व्यावसायिक, नोकरशहा आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित लोक आरएसएससोबत काम करतात, असे अग्रवाल म्हणाले.
सरकारी अधिकाऱ्यांचा हा फोटो 11 जून रोजी आयोजित संघ शिक्षा वर्गाच्या कार्यक्रमाचा होता. त्यात बहुजन समाज पक्षाचे उपाध्यक्ष अच्छेलाल कुशवाह या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते. सतनाचे जिल्हाधिकारी वर्मा यांनी म्हटले आहे की ते प्रोटोकॉलनुसार कार्यक्रमाला उपस्थित होते कारण या कार्यक्रमाला मंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.