अमृतसर – “आदीपुरुष’ चित्रपटावरून सुरू झालेला वाद थांबत नाहीये. आता या चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकाविरोधात अमृतसर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. भगवान वाल्मिकी वीर सेनेचे पंजाब प्रमुख हेम प्रकाश यांनी वकील साई किरण परिंजा आणि अधिवक्ता प्रवीण कुमार टंडन यांच्यामार्फत हा खटला दाखल केला आहे.
हेम प्रकाश म्हणाले की, चित्रपट निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, दिग्दर्शक ओम राऊत, संवाद लेखक मनोज मुनताशीर, अभिनेते प्रभास आणि क्रिती सेनन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “आदीपुरुष’ या चित्रपटात भगवान श्री वाल्मिकींनी रचलेल्या रामायणात छेडछाड करण्यात आली आहे.
त्याचबरोबर या चित्रपतामध्ये आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे. पवित्र रामायणातील पात्रांशी छेडछाड केल्याप्रकरणी चित्रपटातील स्टार कास्ट आणि निर्माता दिग्दर्शक दोषी आहेत. हेम प्रकाश असेही म्हणाले की, आम्ही उप आयुक्त अमृतसर यांच्याकडे यापूर्वी लेखी तक्रार केली होती, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आम्हाला न्यायालयात जावे लागले आहे. यावेळी राष्ट्रीय गोरक्षण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रोहन मेहरा आदी उपस्थित होते.