नगर – कोणताही आजार टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणे गरजेचे असते. करोनावर अद्याप लस उपलब्ध न झाल्याने, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने उपाययोजना म्हणून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक गोळ्यांचे वाटप पारनेर विधानसभा मतदार संघात सुरु आहे, असे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पारनेर येथील ग्रामस्थांना होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले. पारनेर तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आ. लंके यांच्या हस्ते या औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. प्रमोद लंके, बाळासाहेब लंके, विजू औटी, विपुल डोंगरे, तहसीलदार ज्योती देवरे आदिंसह कर्मचारी उपस्थित होते. डॉ. प्रमोद लंके यांनी आर्सेनिक गोळ्यांची माहिती दिली. तर रोग प्रतिकारशक्ती वाढविणे व करोनाच्या बचावासाठी उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.