नवी दिल्ली – लोकसभेचे कामकाज आज सुरू झाले. पण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (Parliament Session 2023) रूवातीलाच विरोधी सदस्यांनी भाजपचे रमेश बिधुरी यांनी दानिश अली (Danish ali) यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करीत गदारोळ सुरू केल्याने काही वेळातच कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकुब करण्यात आले. (PM Modi)
बसपचे सदस्य दानिश अली यांनी भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारे फलक स्वताच्या गळ्यात अडकवले होते. पण संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad joshi) यांनी हा मुद्दा सभापतींच्या निदर्शनाला आणून दिला.
सभागृहात असे फलक फडकावता येत नाहीत, त्यामुळे दानिश अली यांनी ते काढून टाकावेत अन्यथा सभागृहाच्या बाहेर जावे अशी सुचना अली यांना केली. पण त्यांनी ते ऐकले नाही व त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्याला अन्य पक्षांनीही साथ दिल्याने गदारोळ वाढल्याने कामकाज तहकुबीची वेळ आली.
सुरूवातीला सभापतींनी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहणारा ठराव मांडला. आणि त्यांनी लगेच प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर लगेचच हा प्रकार घडला. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास वाया गेला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी सभागृहात उपस्थित होते.तत्पूर्वी, पंतप्रधानांनी सभागृहात प्रवेश केला तेव्हा तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचा विजय झाल्याने भाजपच्या सदस्यांनी ‘बार बार मोदी सरकार’ आणि ‘तीसरी बार मोदी सरकार’ अशा घोषणा देऊन त्यांचे स्वागत केले.