Parliament Security Breach : संसद भवनाच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुरुवारी चार आरोपींना पटियाला हाऊस न्यायालयाने हजर केले. न्यायालयाने चारही आरोपींना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला सात दिवसांची कोठडी दिली. दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, हा सुनियोजित कट होता आणि भारतीय संसदेवरचा हल्ला होता.
दरम्यान, या प्रकरणी सरकारी वकिलांनी माहिती दिली. यावेळी बोलताना, आरोपींनी एक पत्रक काढले होते ज्यात पंतप्रधान मोदी यांना हरवलेली व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले होते आणि जो व्यक्ती त्याला सापडेल त्याला स्विस बँकेतून पैसे दिले जातील असे सांगण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींची १५ दिवसांची कोठडी मागितली मात्र न्यायालयाने ७ दिवसांची कोठडी मंजूर केल्याचे सांगण्यात येत आहे. संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याच्या घटनेतील मुख्य आरोपी ललित झा याला गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली. ललितला दिल्लीतून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संसदेच्या सुरक्षेचा भंग हा नियोजित कट होता. ते सहा जणांनी केले होते, हे सर्व आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सांगितले की, आरोपींनी खासदारांना घाबरवण्यासाठी आणि देशात अशांतता निर्माण करण्यासाठी संसदेवर हल्ला करण्याचा कट रचला होता.