बीड – पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाची फाशी देऊन हत्या केली आणि नंतर आत्महत्येचा बनाव केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील परळी शहरात घडली आहे. अजय शांतीलाल लुंकड यांची हत्या झाली आहे. तर सिद्धार्थ अजय लुंकड असे आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सिद्धार्थला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 नोव्हेंबरला माहिती देण्यात आली होती की, शहरातील विद्यानगर भागात राहणाऱ्या अजय शांतीलाल लुंकड या प्लॉट व्यावसायिकाने आजार पणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मात्र, त्यांनतर आरोपी मुलाचे संशयास्पद वर्तन आणि शवविच्छेदनाच्या अहवालाच्या जोरावर पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे.
आरोपी मुलाने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. वडिलांचे माझ्यावर प्रेम नव्हते म्हणून हत्या केली असे आरोपी सिद्धार्थने सांगितले आहे. हत्येच्या 7 दिवसानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी दिली आहे.