पाचगणी – पाचगणी-महाबळेश्वर मार्गावर पांगारी गावाच्या हद्दीत भिलार वॉटर फॉलजवळ एका वळणावर पर्यटक गाडी व महाबळेश्वरच्या व्यावसायिक मुलांच्या महिंद्रा थार जिप्सी गाडी व आयटेन गाडीचा समोरासमोर झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांमधील नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाल्याने दोन्ही बाजूला सुमारे तीन किलोमीटर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाचगणी बाजुकडून महाबळेश्वरला जाणारी आय टेन गाडी आणि महाबळेश्वरच्या जिप्सी या दोन गाड्यांमध्ये समोरासमोर अपघात झाला. जिप्सी ही गाडी महाबळेश्वर हून पांचगणी कडे येत होती ही गाडी इतकी वेगात होती की चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी समोरील गाडीवर धडकली. धडक इतकी भयानक होती की जिप्सी गाडीतील पाच युवक गंभीर जखमी झाले. जिप्सीतील पाच जखमींना तातडीने वाई येथे आणि आय टेन मधील चार पर्यटकांना बेलएअरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघाताची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात झाली आहे.