सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द : मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत संपन्न
मळवली – लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या लोणावळ्याजवळील कार्ला-वेहरगाव येथील कुलस्वामिनी एकवीरा देवीची आज, सोमवारी (दि. 19) चैत्र सप्तमीला होणारी यात्रा प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आली होती. परंतु धार्मिक परंपरा व रितीरिवाजाने पहाटे आरती अभिषेक, तर सायंकाळी सात वाजता धार्मिक परंपरेनुसार पालखी काढत मंदिर परिसरात फिरवण्यात आली.
या वेळी देवस्थान कर्मचारी गुरव प्रतिनिधी, पुजारी व मोजके ग्रामस्थ यांच्या हस्ते आरती करुन देवीचा मुखवटा पालखीत ठेवण्यात आला. मंदिर परिसरात पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली. महाराष्ट्रातील तमाम कोळी आग्री समाजाची कुलस्वामिनी व मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांचे कुलदैवत असलेल्या श्री आई एकवीरा देवीची यात्रा दरवर्षी कार्ला गडावर लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असते.
तसेच षष्टीच्या दिवशी देवघर या माहेरघरात देवीचा भाऊ काळभैरवनाथाचा पालखी मिरवणूक सोहळा तसेच सप्तमीला कार्ला येथे सायंकाळी सात वाजता वाद्यांच्या गजरात देवीचा मानाचा पालखी मिरवणूक सोहळा व अष्टमीच्या पहाटे देवीचे तेलवन व मानाचा सोहळा पार पडतो. देवीचे हे तीन दिवस चालणारा सोहळ्याला किमान पाच ते सहा लाख भाविक दरवर्षी एकवीरा देवी दर्शनासाठी येत असतात.
करोना विषाणूजन्य आजाराचे संकट सर्व देशवासीयांच्या डोक्यावर थैमान घालत असल्याने भाविकांच्या आरोग्याचा विचार करता मंदिर बंद असल्याने व गडावर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असल्याने सलग दुसऱ्या वर्षी देवीचे पुजारी, गुरव प्रतिनिधी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित पालखी सोहळा संपन्न झाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा एकवीरा देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे.