पुणे – संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमन, मुक्काम व प्रस्थानानिमीत्त पुणे पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदाचा पोलीस बंदोबस्त दरवर्षी पेक्षा थोडा वेगळा असणार आहे. यंदाच्या बंदोबस्तात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. ड्रोन सर्व्हिलंन्सस, लाईव्ह डायव्हर्जन, पालखीचे जीपीएस लोकेशन आणि शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर हे बंदोबस्ताचे वैशिष्टय असणार आहे.
पालखी सोहळ्याच्या नियोजना संदर्भात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी माहिती दिली. यावेळी सह आयुक्त संदीप कर्णीक, उपायुक्त(गुन्हे) अमोल झेंडे, उपायुक्त (वाहतूक) विजयकुमार मगर उपस्थित होते. पुणे शहरात प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी वारी पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. हा ऐतिहासीक सोहळा पाहण्यासाठी व अभ्यासकरण्यासाठी राज्याभरातून तसेच परदेशातून नागरिक येत असतात. या सोहळ्यामुळे शहर आणि परिसरात चैतन्य निर्माण होते.
पालखीशी लाखो लोकांच्या भावना निगडीत असल्याने कोणत्याही परिस्थितीत पालखीचे आगमन व मुक्कामच्या ठिकाणी तसेच मार्गक्रमणाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठी काळजी घेतली जाते. दरवर्षी प्रमाणे यंदाही कडक बंदोबस्त असता तरी त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. दोन्ही पालखांसोबत पोलिसांच्या प्रत्येकी चार दुचाकी असणार आहेत. या चारही दुचाकींना जीपीएस बसवलेले असेल. यामुळे पालख्यांचे लोकेशन सातत्याने कळणार आहे.
त्यानूसार पालखीमार्गावरील वाहतूक बंद आणि सुरु ठेवण्यात येईल. यातील दोन दुचाकी पालखीसोबत तर दोन दुचाकी दोन किलोमीटर पुढे असणार आहेत. पालख्यांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येकी एक ड्रोन दोन्ही पालख्यांसोबत असणार आहे. तर गर्दीमुळे अनेकदा पालख्यांतील वारकऱ्यांचे मोबाईल जॅम होतात. त्यांना नेटवर्क मिळत नाही. यामुळे वैद्यकीय आपत्ती व एकमेकांची ताटाटून झाल्यावर अडचणी निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन दोन्ही पालख्यांसोबत प्रत्येकी दहा दहा वॉकी टॉकी देण्यात येणार आहेत. याचा वापर मोबाईल जॅम झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी असेल.