पालघर- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून अनेक भागांत भूकंपाचे धक्के बसत असून, आज सकाळी पुन्हा एकदा पालघर जिल्हा भूकंपाच्या धक्याने हादरला आहे.
डहाणू तालुक्यातील धुंदलवाडीत आज सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी नोंदली गेली असून, यात कोणतेही वित्त किंवा जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, या सर्व प्रकारची माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली आहे. नोव्हेंबर २०१८ पासून वारंवार धुंदलवाडीला भूकंपाचे हादरे बसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी या गावात भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते.