Entertainment – अभिनेता शाहरुख खानच्या ‘स्वदेश’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशीचा इटलीमध्ये कार अपघात झाला आहे. गायत्री पती विकास ओबेरॉयसोबत लॅम्बोर्गिनी कारमधून प्रवास करत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातून दोघेही थोडक्यात बचावले, मात्र त्यांच्याशी धडकलेल्या फेरारी कारमधून प्रवास करणाऱ्या एका स्विस जोडप्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण प्रकरणाची पुढील कारवाई केली.
गायत्री जोशी आणि त्यांचे पती विकास ओबेरॉय एका लग्जरी कार रेसमध्ये सहभागी झाले होते. घटनेच्या वेळी त्याच्या लॅम्बोर्गिनी कारच्या मागे इतर अनेक आलिशान वाहनांचा ताफा धावत होता. दरम्यान, मिनी ट्रकला ओव्हरटेक करताना त्यांची कार फेरारीला धडकली. अपघातानंतर फेरारी ट्रकला धडकली आणि मिनी ट्रक उलटला. ट्रक पलटी होताच फेरारीने पेट घेतला. हा अपघात इटलीतील सार्डिनिया भागात घडला.
Two deaths on a Ferrari in Sardina, Italy pic.twitter.com/skT3CaXg0T
— Globe Clips (@globeclip) October 3, 2023
2004 पासून चित्रपटांपासून दूर
या गंभीर अपघातानंतर अभिनेत्री गायत्रीने सांगितले की, ‘मी पती विकाससोबत इटलीला जात होती. या अपघातातून मी सुखरूप बचावली, मात्र या अपघाताबद्दल मी तीव्र दु:ख व्यक्त करते.’
गायत्री जोशी बऱ्याच दिवसांपासून चित्रपट आणि बॉलिवूडपासून दूर आहे. ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केल्यानंतर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे. ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे नाव भारतातील मोठ्या रिअल इस्टेट कंपनीमध्ये समाविष्ट आहे.