पाकिस्तानला ओआयसीनेही झिडकारले

नवी दिल्ली – जगातल्या प्रत्येक मंचावर संधी मिळाली की जम्मू काश्‍मीरचे तुणतुणे वाजवण्याची पाकिस्तानची सवय आहे. संयुक्त राष्ट्रांत त्यांचा हा कार्यक्रम असतोच. त्याद्वारे भारताला बदनाम करण्याचा आणि काश्‍मीरमधील आपल्या नापाक कारवाया न्याय्य ठरवण्याचा त्या देशाचा डाव असतो. मात्र त्यांची वर्तणूक आणि त्याद्वारे निर्माण झालेली एक विश्‍वासास पात्र नसलेले राष्ट्र अशी प्रतिमा हेच आता पाकला मारक ठरत आहेत.

हे सगळे सांगायचे कारण म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन अर्थात ओआयसी या मुस्लिम राष्ट्रांच्या संघटनेनेही आता पाकिस्तानाला झिडकारले. काश्‍मीरचा विषय आपल्या चर्चेच्या अजेंड्यावर घेण्यासच ओआयसीने नकार दिला आहे.

नायझर येथे उद्या आणि परवा अशी दोन दिवस इस्लामिक राष्ट्रांची बैठक होणार आहे. त्यात जम्मू काश्‍मीरचा मुद्दा चर्चिला जाणार असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला होता. त्या देशाच्या मंत्र्यांकडून अधिकृतपणे यावर टिप्पणी करण्यात आली होती. मात्र ओआयसीने चर्चेचे विषय काय राहणार आहेत, ते जाहीर करून टाकले असून त्यात कुठेही काश्‍मीरचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानचा हा बारही फुसका ठरला आहे.

हिंसाचार, कट्टरवाद, दहशतवाद, मुस्लिम राष्ट्रांना भेडसावणारे चिंतेचे, इस्लामविषयक असलेले गैरसमज आणि भिती, धर्माच्या आधारावर बदनाम करण्याचे प्रकार, पॅलेस्टीनमधील स्थिती आदी विषय अजेंड्यावर असल्याचे ओआयसीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ओआयसीचा हा अजेंडा भारताचा कुटनीतीच्या दृष्टीने असलेला मोठा विजय मानला जातो आहे. त्याला कारण स्वत:ला मुस्लिम जगताचा भाग मानणाऱ्या पाकिस्तानच्या विषयाकडे ओआयसीने केलेली पाठ.

याला आतंरराष्ट्रीय राजकारणाचाही एक पैलू आहे. अमेरिकेच्या आधाराने जगल्यानंतर आता गेल्या काही वर्षात पाकिस्तानचे चीनवरचे अवलंबित्व वाढले आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम राष्ट्रांत पूर्वी हा देश पैसा आणि अन्य मदतीसाठी सौदी अरब आणि यूएईवर बऱ्यापैकी निर्भर होता. मात्र तेथेही त्यांनी आता मार्ग बदलला आहे.

आता मलेशिया आणि तुर्की यांच्याशी पाकचे गुळपीठ जमले आहे. तर याउलट सौदी आणि यूएईशी भारताचे संबंध घट्ट चालले आहे. त्यामुळेही पाकला यातून एक मिळायचा तो संदेश मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.