#CWC19 : पाकिस्तानचे पुढचे ‘लक्ष्य’ अफगाणिस्तान

स्थळ- हेडिंग्ले, लीड्‌स
वेळ- दु. 3 वा.

लीड्‌स – भारताकडून झालेला पराभवानंतर प्रतिष्ठा व बाद फेरीचे आव्हान राखण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत पाकिस्तानने या स्पर्धेत जोरदार कमबॅक केले आहे. दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघांना पराभूत करणाऱ्या पाकिस्तानचे पुढचे “लक्ष्य” अफगाणिस्तानवर मात करण्याचे असणार आहे. भारताविरुद्ध विजयाच्या उंबरठ्यावरून पराभव पत्करणारा अफगाणिस्तानचा संघ आज त्यांना चिवट झुंज देईल अशी अपेक्षा आहे.

न्यूझीलंडवरील दणदणीत विजयामुळे पाकिस्तानचा आत्मविश्‍वास आणखी वाढला आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्यांच्या खेळाडूंनी सकारात्मक खेळ केला आहे. बाबर आझम याने या लढतीत शानदार शतक टोलविले असून त्याच्या संघाचा तो मुख्य आधारस्तंभ आहे. हॅरिस सोहेल यानेही चांगली कामगिरी केली आहे. मात्र पहिल्या फळीतील फलंदाजांचे अपयश हीच त्यांच्यासाठी मोठी समस्या आहे. त्यावर ते कशी मात करतात हीच आज उत्कंठा आहे.

शाहीन आफ्रिदी, मोहम्मद आमीर व वहाब रियाझ यांच्याकडून येथील लढतीत प्रभावी मारा अपेक्षित आहे. गुलाबदीन नईब याच्या नेतृत्वाखाली उतरणाऱ्या अफगाणिस्तानच्या फलंदाजीची मुख्य मदार मोहम्मद नबी याच्यावर असणार आहे. त्याने भारतीय गोलंदाजांना रडविले होते. त्याच्याबरोबरच नईब, रशीद खान, रहमत शाह यांच्यावरही फलंदाजीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. पाकिस्तानच्या फलंदाजांना मुजीब उर रहमान, मोहम्मद नबी व रशीद खान हे कसे रोखून धरतात यावरच त्यांचे यश अवलंबून आहे.

प्रतिस्पर्धी संघ :

पाकिस्तान – सर्फराझ अहमद (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बाबर आझम, आसिफ अली, फखर झमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वासिम, इमाम उल हक, मोहम्मद आमीर, मोहम्मद हफीझ, मोहम्मद हसनैन, शदाब खान, शाहीन आफ्रिदी, शोएब मलिक, वहाब रियाझ.

अफगाणिस्तान – गुलाबदीन नईब (कर्णधार), आफ्ताब आलम, अझगर अफगाण, दौलत झारदान, हमीद हसन, हशमतुल्ला शाहिदी, हझरतुल्ला झईझई, मोहम्मद नबी, इक्रम अलिखील(यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, नजीब उल्ला झाद्रान, नूर अली झाद्रान, रहमत शाह, रशीद खान, समीउल्ला शिनवारी.

Leave A Reply

Your email address will not be published.