“हायब्रिड ऍन्युइटीची कामे गतीने पूर्ण करा’

दौंड – पुणे जिल्ह्यातील हायब्रीड ऍन्युइटीची कामे गतीने पूर्ण करा, तसेच दौंड-गार पूल आणि बोरीबेल येथील रेल्वे ओव्हर उड्डाण पुलाच्या कामाला देखील मंजुरी द्या, अशी विनंती दौंड तालुक्‍याचे आमदार ऍड. राहुल कुल यांनी विधानसभा सभागृहात केली. त्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्‌द्‌यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार ऍड. राहुल कुल म्हणाले की, राज्यभरातील जास्त लांबीच्या रस्त्यांसाठी हायब्रिड ऍन्युइटीचा अतिशय चांगला कार्यक्रम मागच्या दोन वर्षापूर्वीच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला. ही कामे सुरू करण्यात आली; परंतु बॅंक क्‍लोजर आणि इतर नियम व अटींचा विचार करता ही कामे अतिशय संथ गतीने चालू आहेत. ही कामे अर्धवट असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत.

नागरिकांची गैरसोय होत आहे, त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सर्वच हायब्रिड ऍन्युइटीची कामे गतिमान करण्याची विनंती आमदार कुल आणि प्रशासनाला केली, तसेच दौंड येथील दौंड-गार पूल व बोरीबेल येथील रेल्वे ओव्हर उड्डाण पुलाच्या कामाला देखील मंजुरी द्यावी, अशी विनंती आमदार कुल यांनीकेली.

यावेळी वरील दोन्ही गोष्टींची सरकारने दखल घ्यावी व कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.