नवी दिल्ली ; भारतीय लष्कराचा मुख्य लक्ष साहजिकच लडाखकडे असताना पाकिस्तान सीमेवर लष्कर ए तोयबाचे अतिरेकी भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. सीमेपलिकडे अशा 50 ते 60 दहशतवाद्यांच्या हालचाली भारतीय गुप्तचरांनी टिपल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे तळ उभारण्यात आल्याचे आढळून आले आहे.
लष्करच्या सहा दहशतवाद्यांचा एक गट त्यांचा स्वयंघोषित कमांडर अशफाक बरवाल आणि त्यांचा वाटाड्या कासिमसह पाकव्याप्त काश्मिरमधील कोट कतेराहून काश्मिरातील नौशेरा भागात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे. भींबरगली भागाच्या समोरील पंजांज भागात लष्करच्या आणखी पाच अतिरेक्यांची टोळी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याचे आढळले आहे.
खोल भागातून तीन ते चार दहशतवादी कलबान नार आणि छट्टू बैहक भागातून कास्मिारातील बातीजा चौकीच्या दिशेने येत असल्याचे वृत्त आहे. सीमेजवळील नत्तार गावात स्वयंघोषीत कमांडर सैफुल्लासह चार दहशतवाद्यांची टोळी आहे. त्यांचा कृष्णा घाटी भागात रोशनी नाल्यातून घुसण्याची तयारी सुरू आहे.
आदील इस्माईल याच्यासह सहा दहशतवाद्यांचेच टोळके गुर्रेझ भागात घुसण्याच्या तयारीत आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्तानातील बक्रिद भागातून लष्करचे पाच दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. लष्कर बरोबर हिज्बुल मुजाहिद्दीन ही संघटनाही क्रियाशील झाली आहे. त्यांचे चार दहशतवादी नजरेस आले आहेत. त्यातील तीन पाकव्याप्त काश्मिरमधील आहेत
पाकव्याप्त काश्मिरमधील नौशेरा भागापूढील पाकिस्तान हद्दीत सहा अज्ञात दहशतवादी आढळले आहेत. ही माहिती विविध गुप्तचर यंत्रणांनी संकलीत केली असून त्यातून भारतात दहशतवादी घुसवण्याचा पाकिस्तानच्या कटावर प्रकाशझोत पडला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय दबवानंतरही पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करत असल्याचे यावरून सिध्द होत आहे.