लंडन – कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी विकसित केल्या जात असलेल्या औषध निर्मितीच्या प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा गाठला असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापिठातील संशोधकांनी म्हटले आहे. या विद्यापिठाने विकसित केलेल्या औषधाचे मानवावरील करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीचे निष्कर्श खूपच सकारात्मक असून त्याच्या आधारे करोना विषाणूच्या विरोधात दुहेरी संरक्षण मिळो शकेल, असा दावा संशोधकांनी केला आहे.
ब्रिटनमधील उमेदवारांना या औषधाचा डोस दिल्यानंतर घेतलेल्या नमुन्यांमध्ये या उमेदवारांच्या शरीरार ऍन्टीबॉडीज आणि विषाणूरोधी टी-सेल उत्पन्न झाल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती या संशोधनाशी संबंधित वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
ऍन्टीबॉडीज महिन्याभरात नाहिशा होऊ शकतात. तर टी-सेल शरीरात कित्येक वर्षांपर्यंत कायम राहू शकतात, असे एका स्वतंत्र अभ्यासाद्वारे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हे संशोधन खूपच आशादायक आहे. मात्र ऑक्सफर्डच्या औषधाद्वारे कायम टिकून राहणारी विषाणूविरोधी रोगप्रतिकारक शक्ती मिळत असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही.
ऍन्टीबॉडी आणि टी-सेल या दोन्हीच्या एकत्रित परिणामामुळे व्यक्ती विषाणूच्या संसर्गापासून सुरक्षित राहू शकतो, इतके तरी निश्चित सांगता येऊ शकेल. ही देखील एक चांगली बाब आहे. अजून बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
सोमवारी ऑक्सफोर्ड टीमच्या प्राथमिक टप्प्यातील मानवी वैद्यकीय चाचणीचा डेटा प्रकाशित केला जाईल, असे लॉंसेट ‘मेडिकल जर्नल’ने म्हटले आहे.