नवी दिल्ली -देशात बुधवार सकाळपासून 24 तासांत तब्बल 32 हजार 695 नवे करोनाबाधित आढळले. एकाच दिवसातील त्या नव्या उच्चांकामुळे देशातील बाधितांची संख्या 10 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.
देशात एका दिवसात नोंदल्या गेलेल्या बाधितांच्या संख्येने प्रथमच 30 हजारांचा टप्पा ओलांडला. त्यामध्ये महाराष्ट्र, तामीळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, तेलंगण, पश्चिम बंगाल आणि बिहार या 9 राज्यांचा वाटा सुमारे 80 टक्के इतका राहिला. मागील 24 तासांत देशात करोना संसर्गाने आणखी 606 बाधित दगावले. त्यामुळे देशातील करोनाबळींच्या संख्येने 25 हजारांचा टप्पा पार केला. देशात सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे.
महाराष्ट्रापाठोपाठ तामीळनाडूत दीड लाखांपेक्षा अधिक तर दिल्लीत 1 लाख 18 हजारांच्या आसपास बाधित आहेत. कर्नाटकातील बाधितांची संख्या लवकरच 50 हजारांचा टप्पा गाठण्याची चिन्हे आहेत. गुजरात आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये 43 हजारांपेक्षा अधिक बाधित आहेत.
महाराष्ट्रात करोना संसर्गामुळे सुमारे 11 हजार बाधित दगावले आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीत 3 हजार 500 च्या आसपास मृतांची नोंद झाली आहे. तामीळनाडू आणि गुजरात या राज्यांत करोनाने 2 हजारांहून अधिक बाधितांचा बळी घेतला आहे.