लंडन – ब्रिटनमधील 30,000हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून ते बेरोजगार होतील. वास्तविक, हे असे आरोग्य कर्मचारी आहेत ज्यांनी अद्याप कोरोनाची लस टोचून घेतलेली नाही. याशिवाय ज्यांनी करोना प्रतिबंधक लसीचा केवळ पहिला डोस घेतलेला आहे अशा कर्मचाऱ्यांनाही कामावर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रुग्णांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
– सरकारचा युक्तिवाद
‘द सन’ च्या अहवालानुसार, नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) च्या आकडेवारीनुसार एकूण 34,000 फ्रंट लाइन कामगारांना कामावरून कमी करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये वैद्यकीय कारण सांगून लस घेण्यास नकार देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी सांगितले की, रुग्णांच्या सुरक्षेचा विचार करून आम्ही हे पाऊल उचलले आहे. त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
– मुदत वाढवून देण्याची मागणी फेटाळली
सरकारने काल आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करण्यास नकार दिला होता, त्यात लसीकरणाची अंतिम मुदत एप्रिलपर्यंत वाढवावी, असे म्हटले होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे समोर येत असताना, सरकारच्या या निर्णयामुळे हिवाळ्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता भासू शकते.
– ‘सरकारने आमचा विश्वासघात केला’
बोरिस जॉन्सन सरकारच्या या निर्णयामुळे आरोग्य कर्मचारी प्रचंड संतापले आहेत. लस न घेतल्याने नुकतीच नोकरी गमावलेल्या डेव्ह केली यांनी सांगितले की, कोरोनाच्या सुरुवातीला कोणत्याही संरक्षणाशिवाय स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांचा सरकारने विश्वासघात केला आहे. रुग्णांची सेवा करणाऱ्यांना सरकार विसरले आहे.