पुणे – देशभरात महिलांमधील सर्व्हायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) प्रमाण वाढत असल्याने महापालिकेकडून राष्ट्रीय लसीकरण मोहीमेअंतर्गत पदरमोड करून महापालिका शाळांतील आठवी आणि नववीच्या मुलींना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून ही लस खरेदी करण्यात येणार होती.
शिवाय त्याबाबतची निविदा प्रक्रियाही पूर्ण केली आहे. मात्र, लसीकरण करण्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असल्याने महापालिकेने शासनास प्रस्तावही दिला. मात्र, त्याला शासनाने मान्यताच न दिल्याने ही खरेदी झालेली नाही. दरम्यान, सर्वच शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या असून, आता लोकसभा निवडणुकीनंतरच ही लस खरेदी केली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या लस खरेदीसाठी महापालिकेने मागील वर्षी ठेवलेला निधीही आता वापरता येणार नाही.
गेल्या काही वर्षांत देशभरात, तसेच राज्यातही सर्व्हायकल कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने स्वत: पुढाकार घेत जानेवारी महिन्यात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. ८ फेब्रुवारी हा निविदा भरण्याचा अंतिम कालावधी होता. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळांना सुटी लागण्याच्या आधीच महापालिकेच्या शाळांमधील नववी, तसेच दहावींच्या मुलींना ही लस देण्याचे महापालिकेचे नियोजन होते. त्यामुळे पालिकेने शासनाकडे परवानगी मागितली. मात्र, शासनाने परवानगी देण्यासाठी उशीर केल्याने दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर शासनाने महापालिकेस आचारसंहितेचे कारण देत खरेदी प्रक्रिया करणे संयुक्तिक नसल्याचे कळविले आहे.
सीएसआरची मदत घेणार
मागील वर्षी महापालिकेच्या २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात या लस खरेदीसाठी सुमारे २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, या वर्षी अशी स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली नाही. मात्र, आरोग्य विभाग वर्गीकरणाद्वारे ही तरतूद उपलब्ध करणार आहे. आता ही तरतूद कमी पडत असल्याने आरोग्य विभागाकडून यासाठी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून या लसीकरणासाठी सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेतला जाणार आहे.