मुंबई – दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला मोठी पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्री यांनी ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहे.
आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. नुकतंच, या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
ज्यामध्ये अनुपम खेर, नाना पाटेकर, रायमा सेन, मोहन कपूर आणि पल्लवी जोशी सारखे दमदार कलाकार दिसत आहेत. सोशल मीडियावर देखील चित्रपटाच्या ट्रेलरला मोठी पसंती मिळताना दिसत आहे.
चित्रपटात करोना महामारी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या युद्धात लस तयार करण्यासाठी डॉक्टर आणि शास्त्रज्ञ कसे लढतात? कथा याच विषयाभोवती फिरते. ‘द व्हॅक्सिन वॉर’चा टीझर 15 ऑगस्टला रिलीज झाला. आता ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह सातव्या गगनाला भिडला आहे.
ट्रेलरमध्ये नाना पाटेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तो त्याच्या टीमसोबत लस शोधताना दिसत आहे. ही लस किती महत्त्वाची होती आणि शास्त्रज्ञांनी त्यासाठी किती मेहनत घेतली हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ 28 सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, चित्रपट हिंदीसह इतर अनेक भाषांमध्येही पाहता येणार आहे.