पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतलेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांमधील काही कर्मचारी पालिका सेवेत रुजू होण्यास सुरुवात झाली आहे. ३८७ उमेदवारांपैकी २३ नवे कर्मचारी बुधवारी (दि. २४) महापालिकेत रुजू झाले आहेत. या कर्मचा-यांना करसंकलन व कर आकारणी विभाग आणि अग्निशामक विभागाच्या सर्वेक्षण कामासाठी नेमले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध विभागाच्या १५ पदाच्या एकूण ३८७ जागांसाठी मे २०२३ मध्ये राज्यभरात ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी (पोलिस व्हेरिफिकेशन) आणि शारीरिक पात्रता तपासणी (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट) घेण्यात आहे. आतापर्यंत बहुतांश उमेदवारांनी कागदपत्रे जमा केली आहेत. पात्र असलेल्या सर्व कर्मचा-यांना रुजू करून घेण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.
कर्मचा-यांना रुजू करून घेण्यात येत आहे. सामान्य प्रशासन विभागात रजिस्टरमध्ये नोंदणी करून २३ कर्मचा-यांना बुधवारी (दि. २४) रुजू करून घेण्यात आले. त्यांना ५ फेब्रुवारीनंतर वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तत्पूर्वी, काही कर्मचा-यांना करसंकलन विभागाच्या वतीने सुरू असलेल्या मिळकतीच्या ड्रोन सर्वेक्षणाच्या कामासाठी नेमले जाणार आहे. तसेच, अग्निशमन विभागाकडून व्यापारी आस्थापनांचे फायर सर्टिफिकेट तपासणी केली जात आहे. त्या सर्वेक्षणास गती देण्यासाठी काही कर्मचारी तेथे नेमले जाणार आहेत.
पुण्यातील संस्थेद्वारे प्रशिक्षण मिळणार
नुकतेच भरतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुण्यातील कोथरूड येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हन्मेंट (अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्था) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्थापत्य विभागाचे ४८ अभियंते, विद्युत विभागाचे १८ कनिष्ठ अभियंते, ७४ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक असे एकूण १४० कर्मचारी रुजू होणार आहेत. त्यांना महापालिका क्षमता निर्माण आणि संशोधनासाठी मुंबई येथील एमसीजीएम केंद्रात पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना विविध विभागात नेमले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या विविध विभागांस पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. परिणामी, दैनंदिन कामकाजास गती मिळणार आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.