ओसाका: स्थानिक खेळाडू नाओमी ओसाकाने पॅन पॅसिफिक जपान खुल्या टेनिस स्पर्धेत एकतर्फी विजेतेपद मिळवित वर्चस्व गाजविले. तिने अंतिम सामन्यात ऍनास्ताशिया पावलिचेन्कोवाचा 6-2, 6-3 असा सहज पराभव केला.
ओसाकाने अंतिम सामन्यात पासिंग शॉट्स व व्हॉलीजचा सुरेख खेळ केला. तसेच तिने खोलवर सर्व्हिस करीत ऍनास्ताशियाला सर्व्हिसब्रेकची फारशी संधी दिली नाही. दोन्ही सेटमध्ये ऍनास्ताशियाने परतीचे फटके व सर्व्हिसबाबत केलेल्या अक्षम्य चुकांचा ओसाकाला फायदा झाला. उपांत्य फेरीत ओसाकाने एलिसी मर्टन्सचा पराभव केला होता तर ऍनास्ताशियाने अँजेलिक कर्बरचे आव्हान संपुष्टात आणले होते.
ओसाकाने सांगितले की, घरच्या मैदानावर खेळण्याचा मला फायदा होता तरीही येथे अंतिम सामना खेळताना थोडे दडपण आले होते. ऍनास्ताशिया ही अतिशय जिगरबाज खेळाडू आहे. त्यामुळेच मी अंतिम सामन्यात संघर्ष करावा लागणार आहे अशी मनाशी खूणगाठच बांधली होती. माझ्या सुदैवाने माझे परतीचे फटके तिला रोखता आले नाही. तसेच तिच्याकडून खूप चुका झाल्या. त्याचा मला फायदा झाला. येथील विजेतेपद मला भावी करिअरसाठी उपयुक्त ठरणार आहे.