पुणे: पत्नीला दरमहा पोटगी म्हणून 5 हजार रुपये आणि राहण्यासाठी घराचे भाडे म्हणून 5 हजार रुपये देण्याचा अंतरिम आदेश अभियंता पतीला न्यायालयाने दिला आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विक्रम जगदाळे यांनी दिला आहे.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. माधवी हिने ऍड. पुष्कर पाटील, ऍड. करिश्मा पाटील, ऍड. रेश्मा सोनार, ऍड. शुभांगी जेटीथोर, ऍड. मधु सिंग यांच्यामार्फत कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा दाखल केला होता. अर्ज केलेल्या तारखेपासून म्हणजे जानेवारी 2016 पासून पोटगी देण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. जी रक्कम 4 लाख 60 हजार रुपये होते.
माधवी हिने पोटगी मिळण्यासाठी तसेच कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार स्वतंत्र्य राहता यावे, यासाठी अर्ज केला होता. सुरूवातीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा अर्ज फेटाळला. त्यानंतर या विरोधात सत्र न्यायालयात अपील करण्यात आले.
माधव याने दरमहा सहा हजार उत्पन्न असल्याचे न्यायालयात दाखविले. मात्र, त्याच्या नावावर असलेली चारचाकी गाडी, वडिलांच्या नावावर असलेली संपत्ती ऍड. पुष्कर पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच विविध न्यायनिवाड्यांचा दाखला यावेळी देण्यात आला.