पुणे – केरळमध्ये जेएन – १ या विषाणूचा रुग्ण सापडल्यानंतर सतर्कता म्हणून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच सर्व जिल्ह्यांना कोविड चाचण्या वाढविण्याच्या सूचना राज्य आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात या विषाणूचा रूग्ण सापडलेला नसला, तरी खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
केरळमध्ये ७९ वर्षांच्या महिलेला या विषाणूची बाधा झाली असून, ती पूर्णपणे बरी झाली आहे. जेएन-१ हा ओमिक्रॉन विषाणूचा उपप्रकार असून रूग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहे. त्यामुळे भीती बाळगण्याची गरज नाही. सर्व जिल्ह्यांत रुग्णांचे सर्वेक्षण वाढवावे. सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या आयएलआय आणि सारी रुग्णांचे कोविड चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबरोबर सर्व जिल्ह्यांना कोविड चाचण्या वाढविण्याचे सांगण्यात आले आहेत. या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोविडपूर्व आरोग्य संस्थाचे मॉकड्रील पूर्ण करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व जिल्हे, महापालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी मॉकड्रीलमध्ये सहभाग नोंदविला. रुग्णालयातील उपलब्ध खाटा, आयसीयू सुविधा, यंत्रसामग्री, आॅक्सिजन सुविधा, औषध साठा, मनुष्यबळ, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, टेलिमेडीसीनची सुविधा या सर्व बाबतीत सर्वच रुग्णालयांचा आढावा घेण्यात आला आहे.