पिंपरी – निवडणुका पाठोपाठ निवडणुका आल्या आणि गेल्या पण महापालिकेचे 43 अधिकारी व कर्मचारी गेल्या पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून निवडणूक विभागातच ठाण मांडून बसले आहेत. या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा पालिकेत रूजू होण्याच्या सूचना तथा आदेश देण्यात आले आहेत.
पालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघ निवडणूक विभागात काम करतात. निवडणुकीचे काम हे सक्तीचे असल्याने नियुक्तीचा आदेश मिळताच त्या ठिकाणी रूजू होतात. मात्र, निवडणुकीचे काम संपल्यानंतरही काही कर्मचारी 5 वर्षांपासून परतलेच नाहीत.
या कर्मचाऱ्यांवर पालिकेकडून दरमहा वेतनापोटी नाहक खर्च करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने विविध विभागांकडून या कर्मचाऱ्यांची माहिती मागविली होती. सर्वांधिक क्रीडा विभागाचे 17 क्रीडा शिक्षक आहेत. तर 11 लिपिक, 7 मजूर, 3 मुख्य लिपिक, 2 शिपाई, 2 स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, 1 संगणक ऑपरेटर हे निवडणूक विभागात काम करीत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता 27 ऑक्टोबरला उठविण्यात आली. त्यामुळे निवडणूक विभागात कार्यरत असलेले बहुतांश अधिकारी व कर्मचारी पुन्हा पालिकेत रूजू झाले आहेत. मात्र ते 43 कर्मचारी अद्याप रूजू झालेले नाहीत. त्यांना कार्यमुक्त करण्याचे स्मरणपत्र पाठविले जाणार आहे.