ढेबेवाडी – तळमावले परिसरात संपूर्ण दारूबंदीसाठी एल्गार करणाऱ्या ताईगडेवाडी ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील रणरागिणींनी मंगळवारी दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाकडून झालेल्या सह्यांच्या पडताळणीत दारूबंदी झालीच पाहिजे, असा नारा दिला.
ताईगडेवाडीतील महिलांनी यापूर्वी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करून घेतला होता. याबाबत पुढील कार्यवाही होत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्या कविता कचरे यांच्या पुढाकाराने जागतिक महिलादिनी सह्यांचे निवेदन पाठवून उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत दारूबंदी विभागाने महिलांच्या सह्यांची पडताळणी हाती घेतली होती. मात्र, तेव्हा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कार्यवाही झाली नव्हती, तरीही महिलांनी पुन्हा एकदा एल्गार करत संबंधित विभागाला निवेदन दिले होते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पाटणचे उपनिरीक्षक जंगम, कराडचे उपनिरीक्षक बोडेकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बावकर, हवालदार गायकवाड, बनसोडे, बक्केवाड, माने यांनी मंगळवारी पुन्हा तळमावले ग्रामपंचायतीत सह्यांची पडताळणी केली असता दीडशेपेक्षा जास्त महिलांनी सह्यांची मोहीम यशस्वी केली.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दारू विक्रेत्यांना बोलावून घेतले. त्याला भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कविता कचरे, ताईगडेवाडीच्या सरपंच शोभा भुलुगडे ज महिलांनी आक्षेप घेतला; पण त्यांचे न ऐकता विक्रेत्यांना तेथेच बसवून ठेवण्यात आल्याने यावर महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.