पुणे -पश्चिम बंगालवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र स्थित आहे. तसेच पुढील 24 तासात त्याची तीव्रता आणखी कमी होऊन ते उत्तर-पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी सरकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख चार विभागांत पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. परंतु, येत्या 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ऑरेंज, तर मराठवाडा आणि विदर्भात काही भागात साधारण पावसाचा “यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा शक्यता आहे.