विषमुक्त शेतीवर मार्गदर्शन : 10 ड्रम थिअरीची घेतली माहिती
बेल्हे – जुन्नर तालुका दौऱ्यावर राज्याचे कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे व सेंद्रीय शेती संचालक गणेश तांबे यांनी 14 नंबर-काळवाडी-राजुरी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परसबागांची माहिती घेतली. तसेच शाश्वत फार्मिंग फाऊंडेशनच्या ट्रेनिंग सेंटरला भेट देवून 10 ड्रम थिअरी तंत्राने घरच्या घरी ई.एम.-2 द्रावणाचा वापर करून बनविल्या जाणाऱ्या दशपर्णी अर्क, अमिल अर्क, वेमिल अर्क, देशीकेल्प, मासा अर्क, फळार्क, खेकडा अर्क, कोंबडी अर्क इत्यादी अर्कांच्या वापराची माहिती शेतकऱ्यांकडून घेतली.
बायो-रिसोर्स सेंटर्सच्या उभारणीत या 10 ड्रम थिअरी तंत्राचा अवलंब करून विषमुक्त शेतीच्या शासनाच्या धोरणांमध्ये त्याचा कसा समावेश करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानातून शेतकऱ्यांना आत्मांतर्गत शेताच्या बांधावरच निविष्ठा तयार करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान योजना शेतकरी गट व कंपन्यांसाठी राबविली जाणार असल्याचे तांभाळे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या शेतावर तसेच शेतकरी बचत गटांना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना बायो-रिसोर्स सेंटर्स (बीआरसी) (10 ड्रम मॉडेल) उभारणी करण्यासाठी कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे व कृषी विद्यापीठांतून 10 ड्रम थिअरी हा संशोधनाचा विषय ठरणार असल्याचे शाश्वत फार्मिंग फाऊंडेशनचे संस्थापक मंगेश भास्कर (द्राक्षतज्ज्ञ) यांनी सांगितले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, सूर्यकांत विरणक, काळवाडीचे सरपंच तुषार वामन यांच्यासमवेत 10ड्रम थिअरी संशोधक मंगेश भास्कर, ज्योतीराम वगरे, अणे गावचे सुपुत्र शिवाजी कांबळे, तुषार आहेर, सुजित पाटे, अंजली वामन, अजय बेल्हेकर, राजु औटी, सुरेश बोरचटे, संदीप काकडे, धनंजय ताजवे आदी मान्यवर उपस्थित होते.