रांजणगाव सोसायटीचे अध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांचे मातृप्रेम
रांजणगाव गणपती, सी – जन्म दिलेल्या आईचे आपण उपकार फेडू शकत नाही. पण आईला योग्य तो मान, सन्मान देऊन आपण नात्याची वीण घट्ट करु शकतो, असे प्रतिपादन रांजणगाव गणपती येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष बापूसाहेब कांतीलाल शिंदे यांनी केले. सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्यावर आईला खुर्चीत बसवून पदभार स्वीकारला यावेळी ते बोलत होते.
मुले आणि आईचे नात हे जगावेगळच असत. या कलियुगात आईला वृद्धाश्रमात पाठवणारी मुले आहेत. तशीच आईला सांभाळणारी आणि आईचा शब्द पाळणारीही मुले आहेत. स्वतला पद मिळाल्यावर स्वतः खुर्चीत बसण्याआधी स्वतःच्या आईला त्या खुर्चीत बसवून मान देत एक नवीन पायंडा पाडला आहे.
रांजणगाव गणपती सोसायटीच्या अध्यक्षपदी येथील बापूसाहेब कांतीलाल शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी गावात त्यांच्या सत्कार करण्यासाठी मोठा मित्रपरिवार उपस्थित होता. परंतु शिंदे यांनी स्वतः सत्कार न स्वीकारता आईला फेटा बांधायला लावला. सोसायटीच्या कार्यालयात आल्यानंतर शिंदे यांनी स्वतः अध्यक्ष पदाच्या खुर्चीत न बसता स्वतःची आई कौशल्या कांतीलाल शिंदे यांना तो मान दिला. त्यामुळे त्यांच्या आईंचा ऊर अभिमानाने भरुन आला. तसेच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
यावेळी बोलताना रांजणगाव गणपती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष बापूसाहेब शिंदे म्हणाले, आम्ही तिन्ही भावंड लहान असताना आमचे वडील वारले. आमच्या आईने आम्हा तिन्ही भावंडांना अतिशय हलाखीच्या परिस्थितीत कष्टाने मोठे केले. आज आम्ही तिघेही बहीण भाऊ जे काही आहोत. ते फक्त आईमुळेच आहोत. त्यामुळे आईपेक्षा मला कोणतच पद मोठं वाटत नाही. त्यामुळे मी स्वतः अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताना आईलाच तो मान दिला. बापूसाहेब शिंदे यांनी यापूर्वीही नवीन हॉटेलचे उद्घाटन आईच्या हस्ते करुन समाजात एक वेगळा संदेश दिला होता.