नवी दिल्ली – अदानी समुहाशी संबंधित वादंगावरून विरोधी पक्षांनी गुरूवारी संसदेत आणि संसदेबाहेरही आक्रमक पवित्रा स्वीकारला. संबंधित प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची मागणी विरोधकांनी पुढे केली आहे. त्यातून निवडणुकांचा हंगाम विचारात घेऊन विरोधक भाजपची कोंडी करण्यासाठी पुढे सरसावल्याचे दिसते. अर्थात, अदानी समुहाचा बहाणा करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निशाणा बनवण्याची विरोधकांची रणनीती असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
हिंडेनबर्ग रिसर्च या अमेरिकास्थित संस्थेने केलेल्या आरोपांच्या सरबत्तीवरून अदानी समुह संशयाच्या धुक्यात सापडला आहे. संबंधित प्रकरणावरून शेअर बाजार प्रभावित झाला आहे. एवढेच नव्हे तर, राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी हे मोदींचे निकटवर्तीय मित्र मानले जातात. त्याचा संदर्भ देऊन विरोधकांकडून आणि विशेषत: कॉंग्रेसकडून नेहमीच मोदी मोजक्या उद्योगपतींच्या हितासाठी कार्य करत असल्याचा आरोप केला जातो. आता अदानी समुह वादंगाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर मोदींना घेरण्याची संधी साधण्याच्या प्रयत्नात विरोधक दिसत आहेत. अदानी प्रकरणाचे राजकीय भांडवल करून राजकीय लाभ उठवण्याचा विरोधकांचा इरादा उघड करणाऱ्या विविध घडामोडी गुरूवारी घडल्या.
Pune : कसबा विधानसभा निवडणूकीत नवा ट्विस्ट; कुणाल टिळक यांची…
कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक संसद भवनात झाली. त्या बैठकीत अदानी प्रकरण संसदेत उपस्थित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संबंधित प्रकरणावरून संसद दणाणल्याचे पाहावयास मिळाले. त्याशिवाय, विरोधकांनी आणि प्रामुख्याने कॉंग्रेस नेत्यांनी विविध व्यासपीठांवरून प्रतिक्रिया देताना अदानी समुहाबरोबरच मोदींना लक्ष्य केले. एफपीओ मागे घेण्याची घोषणा करताना गौतम अदानी यांनी नैतिकतेचा आधार घेतला. त्याचा संदर्भ देऊन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोदींचा नामोल्लेख टाळून उपरोधिक ट्विट केले. अदानी यांनी नैतिकतेविषयी केलेले भाष्य त्यांच्या प्रमुख मेंटॉरकडून विनम्रता, साधेपणा आणि सहृदयता या चांगल्या गुणांविषयी दिलेल्या उपदेशासारखेच आहे, असे त्यांनी म्हटले.
China/Taiwan : चेक प्रजासत्ताकच्या ‘त्या’ निर्णयाने चीनचा थयथयाट
छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी रायपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना विविध प्रश्न उपस्थित केले. भाजपविरोधात बोलल्यावर आम्हाला हिंदूविरोधी ठरवले जाते. मोदींविरोधात बोलल्यावर आम्हाला देशविरोधी म्हटले जाते. आता अदानी समुहाने हिंडेनबर्ग संस्थेला भारतविरोधी म्हटले आहे. अदानी समुह म्हणजे भारत आहे का? अदानी समुहाच्या शेअर्सची घसरण सुरू असूनही एलआयसी आणि एसबीआयकडून त्या कंपनीत गुंतवणुकीचे सत्र चालूच आहे. सरकारी कर्मचाऱ्यांकडून नॅशनल पेन्शन स्किममध्ये (एनपीएस) डिपॉझिट केला जाणारा पैसाही त्या समुहात गुंतवला जात आहे का, असा सवालही त्यांनी केला.