पुणे(प्रतिनिधी) : कसबा विधानसभा निवडणूकीत भाजपचा उमेदवार कोण याबाबत तर्कवितर्कांना उधान आलेले असतानाच प्रदेश भाजपकडून या निवडणूकीत नवा ट्विस्ट आणण्यात आला आहे. पक्षाकडून स्वर्गीय मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांची भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रवक्त्यांची विस्तारीत यादी जाहीर केली असून त्यात कुणाल यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडून टिळक यांच्या कुटूंबात उमेदवारी दिली जाण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.दरम्यान, कुणाल टिळक यांच्यासह पुण्यातून आमदार सिध्दार्थ शिरोळे, संदीप खर्डेकर, विनायक आंबेकर आणि अली दारूवाला हे पाच प्रवक्तेपदी असणार आहेत.
कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, कुणाल टिळक, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने तसेच धीरज घाटे इच्छूक आहेत.
तर या पाच जणांची नावे प्रदेश कार्यकारीणीकडून दिल्लीत कळविण्यात आल्याची चर्चा आहे, त्यातच पुढील दोन दिवसात भाजपचा उमेदवार जाहीर होणार असतानाच कुणाल टिळक यांची प्रवक्तेपदी वर्णी लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.