नवी दिल्ली :- राज्यसभेतील सभागृह नेते पियूष गोयल यांनी मंगळवारी विरोधकांवर निशाणा साधला. त्यावेळी गोयल यांनी वापरलेल्या एका शब्दावर तीव्र आक्षेप घेत विरोधकांनी त्यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दिली.
न्युजक्लिक या वेबपोर्टलला भारतविरोधी प्रचारासाठी चीनकडून निधी मिळत असल्याचा आरोप भाजपने याआधी केला. त्या मुद्द्यावर राज्यसभेत बोलताना गोयल यांनी विरोधी पक्ष आणि न्युजक्लिकमध्ये काय संबंध आहेत, अशी विचारणा केली.
त्यावेळी त्यांनी कथितपणे विरोधकांचा उल्लेख देशद्रोही म्हणून केला. त्यामुळे नाराज झालेल्या विरोधकांनी गोयल यांच्या विरोधात हक्कभंग नोटीस दिली. सभागृहात माफी मागण्याशिवाय इतर कुठलाही पर्याय स्वीकारला जाणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.
हक्कभंगाची नोटीस देणाऱ्यांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, आप, राजद, द्रमुक, जेडीयू आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. त्या नोटिसीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दिक युद्धाची धार आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.